ठाणे, दि. २५- जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचारी यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणी, संगणकीय कामकाज व प्रशासकीय बाबी याकरिता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग निड असेसमेंट टेस्ट दि. २३ जुलै रोजी घेण्यात आली. शासनाकडून येणाऱ्या विविध योजना व मार्गदर्शक सुचना राबविण्याकरिता २६५ कर्मचारी यांचे ट्रेनिंग निड असेसमेंट टेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडली.
कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेत १०० गुणांची ट्रेनिंग निड असेसमेंट टेस्ट घेण्यात आली. दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी तसेच दररोज नव्याने तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी टेस्ट घेण्यात आली, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे यांनी दिली.
कनिष्ठ सहाय्यक १६०, वरिष्ठ सहाय्यक ६९, सहाय्यक प्रशासन अधिकारी १२, कनिष्ठ प्रशासन अधिकारी २४ असे एकूण २६५ कर्मचारी यांची ट्रेनिंग निड असेसमेंट टेस्ट घेऊन डिजीटल माध्यमाचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात येत आहे.
ई-ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, कॉम्प्युटराईज टिपणी लेखन, पत्र लेखन प्रशासकीय विषयावरील टिपणी लेखन इत्यादी बाबतची प्रात्यक्षिक टेस्ट घेण्यात आली आहे. कर्मचारी वर्गात यामुळे उत्साहाचे वातावरण दिसून आले व त्यांनी या निमित्ताने पुन्हा प्रशासकीय अभ्यासाचे पुनर्विलोकन केले. कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकाभिमुक सेवा देण्यासाठी व प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी लाभदायक ठरणार आहे.