झारखंड : झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र पुन्हा एकदा हेमंत सोरेन स्वीकारणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी स्विकारला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांच्या बैठकीत काल हेंमत सोरेन यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर चंपई सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेत या संदर्भातलं निवेदन राज्यपालांना दिलं.
जमीन घोटाळ्यासंबंधित, आर्थिक फसवणूक प्रकरणी हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाच महिने ते कारागृहात होते. २८ जून रोजी झारखंड उच्च न्यायलयानं त्यांना जामीन मंजूर केल्यानं ते कारागृहाबाहेर आले आहेत. या काळात त्यांचे विश्वासू सहकारी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.