देशाच्या संरक्षण उत्पादनात २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांकी वाढ झाली आहे. देशात तयार होणाऱ्या संरक्षण उत्पादनाचं मुल्यं १ लाख २६ हजार ८८७ कोटी रुपये झाले असून गेल्या वर्षी झालेल्या १ लाख ८ हजार ६८४ कोटी रुपयांच्या उत्पादनाच्या तुलनेत यावर्षी १६ पूर्णाक ७ दशांश टक्के वाढीची नोंद झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वाढीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ही अतिशय उत्साहवर्धक घडामोड असून, यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे, त्या सर्वांना आपण शुभेच्छा देत आहोत,असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. देशाच्या क्षमतेत आणखी जास्त वाढ करण्यासाठी आणि जागतिक संरक्षण उत्पादनात भारताला एक अग्रणी देश बनवण्यासाठी पाठबळ देणारं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामुळे आपल्या संरक्षण सामग्रीच्या उपलब्धतेत वाढ होईल आणि आपण आत्मनिर्भर बनू असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या कामगिरीचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया कार्यक्रम एका पाठोपाठ एक मैलाचे दगड ओलांडत आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.