मुंबई, दि. ११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जवळील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील मार्गिकेची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. या मार्गिकेवरील साखळी क्र. ४४३/६५० वर छत्रपती संभाजीनगर येथील मौजे फतियाबाद जवळील सुमारे ४० मी. लांबीत काँक्रीट पॅनलमध्ये भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत दखल घेऊन तत्परतेने दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंगे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कळवले आहे.
हा महामार्ग या ठिकाणी ३ मीटरच्या भरावावरुन जात आहे. याठिकाणी प्रथमदर्शनी भरावाच्या कडेचा भाग किंचितसा दबल्यामुळे काँक्रिट रस्त्याच्या पृष्ठभागाला भेग पडल्याचे दिसून आले. या महामार्गाचा पृष्ठभाग सुस्थितीत असून वाहतुकीस कोणताही धोका नाही. ही भेग विशिष्ट केमिकल्स (Epoxy Material Shalifix SC 40) वापरुन ग्रांऊटीगने तातडीने भरण्यात येत आहे. या कामाचा दोष दायित्व कालावधी हा जून, २०२६ पर्यंत असून भेग पडलेला कॉक्रीटच्या रस्त्याचा साधारणतः ५० मी. लांबीचा भाग संपूर्णपणे नव्याने कंत्राटदाराच्या जबाबदारीवर व खर्चाने करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या वाहतुकीस कुठलाच धोका नसून आजूबाजूचे कोणतेही पॅनल खचले अथवा खराब झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. या ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू आहे.