भारताच्या सहकार्यानं मॉरिशसमध्ये राबवल्या जाणाऱ्या १२ सामुदायिक विकास प्रकल्पांचं आज परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस जयशंकर आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी काही करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
२ दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी पोहोचलेल्या जयशंकर यांनी आज प्रवींद्र जगन्नाथ आणि मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री मनिष गोबीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी संरक्षण, आर्थिक सहकार्य यासह पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य व्यवस्था अशा सामाजिक विषयांवरही चर्चा झाली. त्यानंतर जयशंकर आणि प्रवींद जगन्नाथ यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. भारत मॉरिशसचा जुना मित्र आणि सहकारी असून गेल्या काही वर्षात ही मैत्री अधिकच दृढ झाली आहे, असं जयशंकर म्हणाले.मॉरिशसमधल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी भारत कायमच मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्या या मॉरिशस दौऱ्यामुळे उभय देशांना द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेण्याची संधी मिळेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.