डोंबिवली ( शंकर जाधव ) : महानगरपालिका क्षेत्रात अवैधरित्या म्हैसवर्ग जनावराचे मांस विक्री करणा-या दुकानांवर शुक्रवार 5 तारखेला महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागा मार्फत धडक कारवाई करण्यात आली. महापालिका हददीत विनायक कॉलनी चाळ, विठ्ठलवाडी बस आगार जवळ कल्याण (पू), रामनगर खदान टेकडी, नेतिवली, सूचक नाका, गफूर डॉन शाळेच्या शेजारी, मेट्रो मॉल समोर काही दुकानदार हे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता म्हैसवर्ग जनावराचे मांस विक्री करीत असल्याची माहिती बाजार व परवाना विभागाचे सहायक आयुक्त, प्रसाद ठाकूर यांना मिळाली होती. सदर दुकानांवर कारवाई करणे संदर्भात या विभागाचे उप आयुक्त अवधूत तावडे यांचे निर्देशाने आज सकाळी कारवाई करण्यात आली.
विनायक कॉलनी चाळ, विठ्ठलवाडी बस आगार जवळ शौकत कुरेशी व त्यांचा कामगार हे अवैधरित्या मांस विक्री करीत होते बाजार परवाना पथकाने तेथे धाड टाकून 10 किलो मांस जप्त करून दुकानाचा गाळा सिल केला. यापूर्वी देखिल बाजार परवाना विभागाने शौकत कुरेशी यांचा परवाना क्रं.केएम 104 रद्द केलेला आहे. नंतर रामनगर खदान टेकडी, नेतिवली, येथे धाड टाकली असता सदरहू दूकानदार दूकान बंद करून पळून गेला. मेट्रो मॉल समोरील गफूर डॉन शाळेच्या शेजारी युसुफ गौसू शेख यांच्या दुकानातुन 5 किलो मांस जप्त करण्यात येवुन, सदरचा गाळा सिल करण्यात आला आहे.
याप्रसंगी बाजार परवाना विभागातील प्रशांत धिवर, प्रांजल बागडे, सज्जाउद्दीन पिरजादे हे कर्मचारी तर गणेश वाघमोडे आणि कांगणे हे पोलिस कर्मचारी उपास्थित होते.मांस विक्री करतांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार महानगरपालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. उपरोक्त विक्रेत्यांकडे कोणताही परवाना नसल्याने तसेच जे दुकानदार अवैधरित्या मांस विक्री करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे उप आयुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले.