पुणे : पुण्यात आज ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते निर्मल दिंडीचा प्रारंभ झाला. आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असल्यानं वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असं महाजन यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांनी धार्मिक विचारांसोबतच स्वच्छतेचा तसंच सामाजिक संदेशही दिला. निर्मल वारीच्या निमित्तानं हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. निर्मल वारीसाठी गेल्यावर्षीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन दिला आहे. पालखी मार्गावरील गावांना त्रास होऊ नये, रोगराई पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ सनदी अधिकारीही उपस्थित होते.