प्रतिनिधी- रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 ने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून रोटेरीयन दिनेश मेहता यांची निवड जाहीर झाली असून या कार्यक्रमात रोटरी क्लब व ठाणे महापालिका यांच्यात विविध सामाजिक उपक्रमांसाठी सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक या देखील उपस्थिती दर्शविली. ‘आपण सगळे या समाजाचे घटक आहोत. समाजातील सर्व घटकांचा विकास करताना सर्वाना बरोबर घेऊन चालायला हवे. एक परिपूर्ण निरोगी समाज ही काळाची गरज आहे. आपल्याबरोबर इतरांचाही आपण विकास करणे ही मानवता आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेतून ठाण्यात अनेक प्रकल्प उभे राहत आहे ही चांगली बाब आहे. अशा उपक्रमाना आमचा पाठींबा नेहमीच राहील’, असे प्रतिपादन श्रीमती सौनिक यानी व्यक्त केले.
प्रतिष्ठापन सोहळयाचे आयोजन काशिनाथ घाणेकर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रोटरी इंटरनॅशनलेचे माजी अध्यक्ष श्री. के. आर. रविंद्रन हे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेहून उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पालिका अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, पालिका उपायुक्त गजानन गोदेपुरे, पोलीस उपायुक्त श्री. देशमुख तसेच रोटरी क्लबचे सदस्य, कार्यकारीणी सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यानी देखील कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवून रोटरी सदस्याना शुभेच्छा दिल्या.
दिनेश मेहता हे रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटीचे सदस्य असून याच क्लबद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रोटरी जिल्हा कोअर टीमची स्थापना देखील झाली.
श्री. दिनेश मेहता यानी त्यांच्या भाषणात ठाणे जिल्ह्यातील समाज घटकांच्या विकासासाठी रोटरी तर्फे करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रोटरीने ठाणे महापालिकेबरोबर करार करून शिक्षण, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामंजस्य करारावर सही करण्यात आल्या.
रोटरीने यावर्षाच्या त्यांच्या विविध प्रकल्पांच्या कामाला सुरूवात केली असून भुकेल्याना अन्न देण्याच्या दृष्टीने अन्नपूर्णा उपक्रम राबवून एक हजार जणांच्या जेवणाची सोय केली.
ठाणे महापालिका व रोटरीच्या संयुक्त विद्यमाने पालिका शाळातील मुलाना संगणक प्रशिक्षण मिळावे यासाठी ९ शाळांमध्ये कॉम्पुटर लॅब सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे मुलाना संगणकाचे शिक्षण देण्यात येणार आहे. मुलाना डिजीटल साक्षर करण्याचा रोटरीचा प्रयत्न आहे.
तसेच स्वयंरोजगार किंवा नोकरीच्या दृष्टीने व्यावसायभिमुख शिक्षण देणारे कौशल्य विकास व व्यवसायीक प्रशिक्षण केंद्र ठाण्यात रोटरीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. रोटरीच्या माध्ममातून शिक्षकांसाठी आधुनिक सुविधानी प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येत आहे.
रोटरीने क्षयरोग रूग्णांसाठी निक्षय मित्र म्हणून पुढे पाऊल टाकले आहे. या भूमिकेमध्ये 300 टीबी रुग्णांच्या कुटुंबासाठी पोषण आहाराचे किट देण्यात येणार आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा सर्व्हायकल कॅन्सर पासून वाचण्यासाठी पालिका शाळातील मुलाना त्याची लस रोटरीतर्फे मोफत दिली जाणार आहे. तसेच जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या बालकांची हृद्यशस्त्रक्रिया देखील रोटरीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यावेळी रोटरी क्लबतर्फे प्रकाशित ‘रोटरी’ मासिकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी इंटरनॅशनचे के. आर. रविंद्रन यानी रोटरीच्या सेवाभाव योजनेची माहिती देऊन जगभरातील नागरीकांसाठी रोटरी हे उत्तम समाजसेवेचे चांगले उदाहरण असल्याचे सांगितले.