नवी दिल्ल्ली : एनडीए संसदीय दलाची अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय दलाची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरु असलेल्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान आयोजित एनडीएची ही पहिलीच बैठक होती. देशसेवा सर्वोच्च असल्याचं पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितलं, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना दिली.
नागरिकांनी सदस्यांना देशसेवेसाठी निवडून दिलं असून पक्ष कुठलाही असो देशसेवा ही आपली पहिली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. खासदारांनी नियमाप्रमाणे वागावं, संसदीय लोकशाहीच्या संस्कृतीचं पालन करावं, असं सांगून खासदारांच्या वर्तनाबाबतही पंतप्रधानांनी मार्गदर्श केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.