मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत सरकार प्रती हेक्टरी पाच हजार इतकी मदत देईल, अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली. तसंच यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, ७ हजार ५२१ या केंद्र सरकारच्या नवीन दराने खरेदी केली जाईल, अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली.
ई पीक नोंदणी नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन ग्रामसेवक, तलाठी आदींची समिती नेमून नोंदणी वाढविण्यात येईल असं मंत्री म्हणाले. पुण्यातील कात्रज इथल्या चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन जानेवारी २०२५ पर्यंत ते काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
पाणी टंचाई असणाऱ्या शहरांमध्ये इमारत विकासकाला पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी लागेल आणि तसं खरेदीच्या करारपत्रात लिहूनही द्यावं लागेल, अशा सूचना नगरविकास विभागामार्फत दिल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पारंपरिक पध्दतीनं मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर आर्थिक दंडासोबत गुन्हा दाखल करण्याचेही प्रयत्न केले जातील, अशी माहिती मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुंबईत अनेक ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही, नागरिकांना याचा रोज त्रास होत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्याने संबधित मंत्र्यांच्या मार्फत सभागृहाला या अधिवेशन काळातच अवगत करावे अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली.