ठाणे,दि.30:- मुरबाड मधील डोंगराळ भागात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम दि.23 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाला.
त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा, चिंचवाडी येथे आणि इतर 7 जिल्हा परिषद शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचा संदेश असलेल्या 150 स्कूल बॅगचे वाटप कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली, मोटर वाहन निरीक्षक प्रशांत देवने, सहायक मोटर वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, बांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे श्री.बांडे आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री.देवने यांनी विद्यार्थ्यांना वाहतूकीची पंचसूत्री जसे हेल्मेटचा वापर करावा, सीट बेल्ट वापरावा, मोबाईल वापरून वाहन चालवू नये, वेगावर नियंत्रण ठेवावे, मद्यपान करून वाहन चालवू नये आदी बाबींचे महत्व पटवून दिले तसेच रस्ता सुरक्षा नियमांची माहिती दिली. भविष्यात वाहन चालविताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना याप्रसंगी शपथही देण्यात आली.