कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जुलै महिन्यात मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत ५४ जणांकडे १७ लाख रुपये, कोनगाव शाखा परिसरातील २९ जणांकडे १६ लाख ४६ हजार रुपये, गोवेली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत २४ जणांकडे ९ लाख ५१ रुपये आणि खडावली शाखा परिसरातील १५ जणांकडे ३ लाख ६१ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा टाळल्यामुळे या सर्वांविरुद्ध दिलेल्या फिर्यादनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंते तुकाराम घोडविंदे,धनंजय पाटील व अभिषेक कुमार तसेच कनिष्ठ अभियंते अलंकार म्हात्रे आणि सचिन पवार यांच्या चमुने ही कामगिरी केली. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कोणतीही युक्ती वापरून वीजचोराचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.