ठाणे दि.12 : महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन" दि.०१ ऑगस्ट पासून "महसूल पंधरवडा-२०२४" साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी "एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा" या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन करण्याची जबाबदारी भिवंडी तालुक्यावर देण्यात आली होती. त्यानुषंगाने वऱ्हाळदेवी माता मंगलभवन, कामतघर, भिवंडी येथे दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी "एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा" या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अजय वैदय, उपायुक्त (आरोग्य विभाग) डॉ.अनुराधा बाबर, भिवंडी तहसिलदार अभिजीत खोले, भिवंडी अपर तहसिलदार अभय गायकवाड, भिवंडी पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी ठोंबरे हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अंदाजे ३५० ते ४०० दिव्यांगांनी शासकीय योजनांच्या माहितीचा लाभ घेतला. या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना समाजकल्याण विभाग, महानगरपालिका, तहसिलदार कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना, जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात येणारे दिव्यांग प्रमाणपत्र व त्याचे लाभ, तसेच रेशनकॉर्ड व इतर दाखले या लाभांची माहिती देण्यात आली व त्याचे प्रत्यक्ष लाभही देण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त जिल्हा आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले होते. या शिबिरात १०० ते १५० लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत (ग्रामीण व शहरी) व भिवंडी महानगरपालिका समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आलेल्या लाभार्थीपैकी काही लाभार्थींचा सत्कार करुन त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात संजय गांधी निराधार योजना (मनपा क्षेत्र) मधील ५, संजय गांधी ग्रामीण क्षेत्रातील ६ लाभार्थीना, समाज कल्याण विभागामार्फत एकूण १५ दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट दिव्यांग सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एकूण ५ दिव्यांगांना रेशनकॉर्डचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर स्थायी दिव्यांगाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एकूण ८ उत्कृष्ट प्रतिनिधींचा आणि आंतरराष्ट्रीय पॅरा, ऑलिम्पिक सूवर्णपदक विजेता अशोक तुकाराम भोईर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बांबू लागवड करणाऱ्या ६ दिव्यांग शेतकऱ्यांना बांबूची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.