डोंबिवली ( शंकर जाधव ) : सागर जोंधळे यांनी डोंबिवली पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीतील शिक्षण सम्राट शिवाजी जोंधळे यांचा मृत्यू आजारपणामुळे नव्हे तर त्यांना वेळेवर उपचार मिळू दिले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.याप्रकरणी कल्याण न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना कल्याण न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सागर जोंधळे यांनी दिली.विष्णूनगर पोलिसांनी गीता खरे यांच्यासह पाच जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सागर जोंधळे म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून विष्णूनगर पोलिसांनी पाच जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खरे यांच्या जावयाचे नातेवाईक असलेल्या राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव आणि काही गुंडांची मदत घेतल्याचा आरोप करत कल्याण न्यायालयात दावा दाखल केला आहे.
पत्रकार परिषदेत सागर जोंधळे पुढे म्हणाले, समर्थ समाज ट्रस्ट तसेच विघनहर्ता ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात महत्वाचे काम करत शाळा महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग महाविद्यालया सारख्या संस्था डोंबिवली ठाकुर्ली, अंबरनाथ आणि आसनगाव मध्ये २७ संस्था स्थापन करत २२०० कर्मचाऱ्यांना काम आणि लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शिवाजी जोंधळे याना शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जात होते.१९ एप्रिल रोजी शिवाजी जोंधळे यांचा आजारामुळे मृत्यू झाला.आपल्या वडिलांना कॅन्सर सारखा गंभीर आजार असतानाही या आजारावर अवयव ट्रान्सफर उपचार करण्याकरता आपण सगळे मतभेद बाजूला ठेऊन समोर आलो. वडिलांची दुसरी पत्नी म्हणून वावरणाऱ्या गीता खरे तसेच त्यांच्या मुलांनी आणि जावयाने त्यांना वेळेत उपचारासाठी दाखल न करता घरात ठेवत नातेवाईकांना भेटण्यास बंदी घातली होती.वेळेत उपचार न देता आपल्या वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्ता घाई गडबडीत स्वतःच्या नावावर खरे आणि इतर पाच जणांनी करून घेतल्या.
याप्रकरणी गीता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क क्रमांक बंद आहे. तर प्रमोद हिंदुराव यांनी हे आरोप फेटाळताना गीता खरे यांचे जावई प्रीतम देशमुख हे आपले नातेवाईक असून आपले आणि शिवाजी जोंधळे यांचे सलोख्याचे संबंध होते. उलट बाप मुलामध्ये असलेले वितुष्ट जगजाहीर आहे,यामुळे आपल्याला नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून न्यायालय योग्य निर्णय करेल असे स्पष्ट केले आहे.