Type Here to Get Search Results !

होतकरुंना जर्मनीत रोजगाराची संधी; शासन करणार जर्मन भाषा शिकण्याचा खर्च



ठाणे, दि.21 :- जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्र सरकारने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भातील सामंजस्य करार केला आहे. याच करारानुसार ठाणे जिल्ह्यातील होतकरूंना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका व्यक्तीवरील प्रशिक्षणाचा खर्च सुमारे 33 हजार रुपये राहणार असला तरी तो खर्च शासन करणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.संजय वाघ यांनी दिली आहे.

बाडेन-वुटेनबर्ग या राज्याने किमान 10 हजार कुशल मनुष्यबळाची मागणी नोंदविली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रशिक्षण बेरोजगारांना विदेशात रोजगार उपलब्ध व्हावा, या हा हेतूने करार करण्यात आला आहे.

जर्मनीत रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना जर्मन भाषा व तेथील राजशिष्टाचाराची माहिती देण्यासाठी सुरुवातीला प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय जर्मन भाषा जर्मनी येथील गोथे या संस्थेच्या सहकार्याने शिकविली जाणार आहे. परीक्षा उत्तीर्ण केलेल्यांना जर्मनीत चांगले वेतन असणारा रोजगार उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून संबंधित करार 25 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला आहे.

आरोग्य क्षेत्राचा विचार केल्यास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिका, सहाय्यक रेडिओलॉजिस्ट, सहाय्यक दंत चिकित्सक, वैद्यकीय लेखा अधिकारी, कौशल्य विकास क्षेत्रातील स्वागत कक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक तर तंत्र शिक्षण क्षेत्रातील प्रशिक्षित वीजतंत्री, अक्षय ऊर्जा वीजतंत्री, औष्णिक वीजतंत्री, गवंडी काम करणारे, नळ जोडणी, वाहन चालक, सुरक्षा रक्षक अशा एकूण 30 विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी ही सूवर्णसंधीच राहणार आहे. जर्मन भाषेचे प्रशिक्षण व राजशिष्टाचाराबाबतच्या प्रशिक्षणानंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र प्राप्त व्यक्तींना जर्मनीत रोजगार मिळणार आहे.

विविध क्षेत्राचे प्रशिक्षण घेतलेले आणि जर्मनीत रोजगारानिमित्त जावू इच्छिणाऱ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जर्मन भाषा शिकण्यासाठी https://www.maa.ac.in/GemanyEmployment/ संकेतस्थळावर नोंदणी करावी. जर्मन भाषा शिकण्यासाठी अंबरनाथ येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) सहकार्याने एस.एस.कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्टस्, नेरुळ, नवी मुंबई, सतीश प्रधान ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे, नूतन विद्यालय, कल्याण, ठाणे, जे.ए.ई. चे एम.एच. विद्यालय, तलाव पाळी, ठाणे (पश्चिम) या शाळा व महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात आला आहे, असेही प्राचार्य डॉ.संजय वाघ यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies