डोंबिवली ( शंकर जाधव ) :खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सह्याद्री बंगल्यावर शुक्रवार 16 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २७ गावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने समितीने मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. २७ गावातील दहा पटीने अधिक वाढीचा मालमत्ता कर कमी करण्याबाबतचा जीआर प्रसिद्ध झाला आणि पुढील आठवड्यात सुधारीत बिले वितरित करीत असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
गुलाब वझे, गजानन मांगरुळकर, बंडू पाटील, दत्ता वझे, शरद पाटील, बाळाराम ठाकुर, विजय पाटील, ब्रह्मा माळी, महेश पाटील, युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आदी संघर्ष समितीची मान्यवर मंडळी,
कामगारांच्या वतीने भानुदास पाटील, समर वझे आणि भगवान म्हात्रे आदी बैठकीसाठी उपस्थित होते. २७ गावातील ४९९ कामगारांना पर्मनंट करण्याचा मार्ग मोकळा करून त्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात आले. पेंढारकर काॅलेज प्रकरणी प्रशासक नेमणुक करण्याबाबत न्यायालयाच्या आधिन राहून त्वरित कार्यवाही करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले. २७ गावातील जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे वर्ग करुन घेणे बाबत जि.प.अधिकारी आणि महापालिकेला सुचना देण्यात आल्या. कित्येक वर्षांपासून अजिबात न पुरविण्यात आलेल्या रस्ते गटारे आदी २७ गावातील पायाभूत सुविधा तातडीने करुन देण्याबाबत महापालिकेला आदेशित केले.
२७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्याकामी प्रस्तावित अमृत योजनेसाठी अधिक निधी देण्याचे मंजूर करून हि पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.ह्या आतापर्यंतच्या प्रलंबित कामांच्या निर्णयामुळे एकुणच संघर्ष समितीच्या आजवरच्या अथक प्रयत्नांना चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचे 27 गाव समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.हा ऐतिहासिक निर्णय मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे संघर्ष समितीने आभार मानले आहे