Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • १७ ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्यांचे वितरण
  • पांझरा – कान सहकारी साखर कारखाना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय सूत गिरणी सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार
  • साक्री येथील महिला सक्षमीकरणाच्या मेळाव्यात विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण
  • उपजिल्हा रुग्णालय, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल इमारतीचे ई‌ – भूमिपूजन

धुळे, दि. १०  : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील. यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रूपये दिले जाणार आहेत. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला-भगिंनीना आश्वस्त केले.

साक्री तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेला पांझरा – कान सहकारी साखर कारखाना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय सूत गिरणी सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

भाडणे, ता.साक्री येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज पार पडला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ व विविध शासकीय योजनांच्या लाभांचे महिलांना वितरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते भाडणे (ता.साक्री) येथील नवीन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल इमारतीचे ई‌ – भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटनही  पार पडले. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे,  आमदार सर्वश्री किशोर दराडे, आमश्या पाडवी, जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी या खान्देशी बोलीतून‌ भाषणाला सुरुवात करत महिलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आठे जमेल शेतस् त्या समदा ताईसले मना नमस्कार.. तुमनाकरीता ह्या भाऊ नी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण हाई योजना आणेल शे…तुमी अर्ज कया ना…आते रक्षाबंधन ना पहले तुमना खाता मा ओवाळणी जमा होणार शे’..

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा महाविराट म्हणावा असा महिला सक्षमीकरणाचा मेळावा आहे. कुणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही लाखो – करोडो बहिणी आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात‌ होऊन एक महिना झाला आहे.  सुमारे दीड कोटी माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्टनंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे. ही योजना बंद होण्यासाठी सुरु केलेली नाही. ती पुढेही कायम सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारण्यात येत‌ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शासनाने गरीब घरातल्या मुलींना लखपती करणारी ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली. यात मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. २५ लाख लखपती दीदी शासन तयार करत आहे.  आतापर्यंत १५ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. महिलांना स्वत: त्यांच्या पायावर उभे राहाता यावे यासाठी म्हणून पिंक रिक्षा देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अडीच लाख महिला स्वयंसहायता समूहांना कर्ज दिले आहे. ज्येष्ठांना देवदर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे.‌ एसटीच्या तिकिटात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्ध महिलांना सुद्धा वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. तरूणांसाठी सुद्धा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत शेतकऱ्यांना  7.5 अश्वशक्ती वीजपंप असणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही त्यांनी सांगितले.

घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे‌. या अभियानात सर्व शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिक यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येकांनी घरावर, दुकानावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जनाबाई वाघ या बहिणीचा फॉर्म स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला आणि त्यावर तिची सही घेऊन तो फॉर्म जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपूर्द केला.

यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल, आ.आमश्या पाडवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे  प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये तनुजा लिंगायत, कु.दीक्षा सोनवणे, वैष्णवी मराठे ( मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना), आसमा याकुब मन्सुरी, जनाबाई वाघ, इंदुबाई गायकवाड, सुरैय्या जाकीर ( १५०० रुपये दरमहा सानुग्रह अनुदान ), स्वामी महिला बचत गट – भाडणे, (१० हजार जोखीम प्रवणता निधी), सिध्दीविनायक महिला बचत गट – भाडणे (समुदाय गुंतवणुक निधी ६० हजार रुपये), कुसूम रौंदळे ( नोंदणीकृत बांधकाम कामगारास अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप), पुजा सोनवणे (नोंदणीकृत कामगारास गृहपयोगी संच वाटप), योगिता पारधी ( केंद्रवती अर्थसंकल्प योजनेतंर्गत अर्थसहाय्य योजना), मनिषा पाटील (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), सविता बारीस ( बिरसा मुंडा कृषी क्रांति योजना), मोनिका गवळी ( प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना), सोनाली गोरे (मोदी आवास योजना), विद्याबाई मराठे (प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ), वंदनाबाई बारसे ( इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना), नलिनी देवरे (ड्रोन दिदी), वैष्णवी पाटील, पुजा चव्हाण (नवनियुक्त तलाठी नियुक्ती पत्र ) या महिला लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यातील‌ काही महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्यास पारंपरिक वेशभूषेत पेहराव करुन महिला सहभागी झाल्या होत्या. सर्वधर्मीय महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी महिलांना तिरंगा भेट देऊन हर घर तिरंगा मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.  स्थानिक आदिवासींनी आपल्या पारंपरिक नृत्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर बहारदार सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचे महिलांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात स्वागत केले. व्यासपीठावरील मान्यरांनी मुख्यमंत्र्यांचे तीरकमान, पावरी वाद्य व वीर एकलव्य यांची मुर्ती देऊन स्वागत केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार मंजुळा गावित यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे, पुनम बेडसे यांनी तर आभार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |