वरिष्ठांचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी करणार नाही : जिल्हाधिकारी
ठाणे ( विनोद वास्कर ) : आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हेदुटने, उत्तरशिव येथे म्हाडा तर्फे मुंबई मधील गिरणी कामगारांसाठी घरांची निर्मिती केली जाणार आहे.यासाठी या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी जमिनीची मोजणी महसूल विभागाच्या वतीने सुरू करण्यात येत होती. मात्र या मोजणीला स्थानिकांनी विरोध दर्शविला होता. यावेळी तहसीलदार यांच्याशी आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीवरून संवाद साधून सर्वे थांबविला होता. व त्याचवेळी ग्रामस्थांना आश्वासन दिलं होतं की लवकरच या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याचे अश्वासन दिले होते.
त्या नुसार आज जिल्हाधिकारी डॉ.अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण, ठाणे तहसीलदार यांसह ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी तेथील समस्यांचा पाढाच वाचला. बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी अन् त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्या याबाबतीतील होत्या. यावर जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे सूचित केले. तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा, त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी डायघरवासियांसाठी तातडीने घेतलेल्या या बैठकीबद्दल आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी आभार मानले.
यावेळी हेदूटणे व उत्तरशीव गावचे ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.