डोंबिवली ( शंकर जाधव ) : दिव्यांगाच्या समस्यांबाबत विभागप्रमुख यांनी नियमित बैठका घेऊन निराकरण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात संपन्न झालेल्या बैठकीत दिले. सदर बैठकीस महापालिकेचे अति.आयुक्त हर्षल गायकवाड, विभागप्रमुख संजय जाधव, समाजविकास अधिकारी प्रशांत गव्हाणकर तसेच दिव्यांग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगाकरीता स्पर्धा आयोजित करणे, महापालिकेच्या मुख्यालयासह 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयात शौचालय सुविधा पुरविणे, दिव्यांगाच्या वैद्यकिय प्रतिपूर्तीची प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणे, दिव्यांगाना योग अभ्यासासाठी आर्ट ऑफ लिव्हींग यांचेकडून कॅम्पचे आयोजन करणे, दिव्यांगासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच इतर लाभ मिळणेसाठी counseling सेंटर मधून फॅसिलिटेशन सुरु करणे इत्यादी बाबींवर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
महापालिकेकडून स्टॉल देणे बंद केले असून फुटपाथवर स्टॉल उभारणेस परवानगी दिली जाणार नाही, तथापी जे पात्र / अधिकृत आहेत, अशा दिव्यांगाकडून प्राप्त झालेल्या अर्जांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. जेव्हा महानगरपालिकेकडे बांधीव वास्तू प्राप्त होतील तेव्हा पुनर्वसन करण्यात येईल. रस्त्यांच्या फुटपाथवर स्टॉल उभारणेस परवानगी दिली जाणार नाही. अशी माहिती यावेळी उपस्थित प्रतिनिधींना देण्यात आली त्याप्रमाणे दिव्यांगाना घरकुल योजना राबविणे अनुषंगाने सकारात्मक विचार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती यावेळी आयुक्तांनी या बैठकीत दिली.
तसेच दिव्यांग वैद्यकिय प्रतिपूर्ती मध्ये ज्या आजारांचा समावेश नाही अशा आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून मोफत उपचार सुरु करणे संदर्भात निर्णय घेणेत आला, त्याप्रमाणे दिव्यांग पेन्शन महिन्याच्या 10 तारखे पुर्वी दिव्यांगाना देण्यात येईल, दिव्यांग संस्थांना कार्यक्रमाकरीता आवश्यकतेनुसार महिन्यातून एकदा मोफत महापालिकेचे सभागृह उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती सदर बैठकीतील उपस्थितांना देण्यात आली.