Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

देवकृपा द्रोणागिरी येथील हिट अँड रन प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची उरण सामाजिक संस्थेची मागणी.



उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : दि. २४/०८/ २०२४ रोजी रात्री देवकृपा चौक, दोणागिरी नोड, उरण येथे झालेल्या येथे झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेतर्फे न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आली आहे.
दि. २४/०८/२०२४ रोजी रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास देवकृपा चौक, द्रोणागिरी रोड, उरण येथे एका वाहनाने भीषण अपघात केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. चार-पाच महिन्यांपूर्वी उरण मध्येच एका बेधुंद वाहनचालकाच्या अक्षम्य चुकीमुळे पती-पत्नी जोडप्याला प्राण गमवावे लागले तर त्यांची ३-४ वर्षांची चिमुकली मुलगी गंभीर मृत्यूशी झुंज देत आहे. बेदरकार चालकांमुळे निरापराध्यांचे जीव जाणे ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर, जागरुक नागरिक म्हणून नागरिकांनी तसेच उरण उरण सामाजिक संस्थेने पोलीस प्रशासनाकडून दोषीवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या सर्व घडामोडी नंतर उरण सामाजिक संस्थेने विविध सवाल उपस्थित केले आहेत.अपघात झालेल्या वाहनाचा शोध लागल्यामुळे वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच वाहनचालक एक महिला असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. वाहनाचा क्रमांकही 'खास' वर्गातला दिसतो.सीसी टिव्ही फुटेजवरून स्पष्ट दिसत आहे कि, वाहनचालकाचे नियंत्रण सुटलेले आहे व तो बेभानपणे बाजूला धडकलेला आहे. त्यामुळे वाहनचालक कुठल्या नशेच्या प्रभावाखाली होता का ? हे चोवीस तासांच्या आत तपासणे योग्य ठरेल. त्यादृष्टीने तपास झाला असावा. वाहनचालक गाडी सोडून पळाल्याचे समजते. त्यामुळे हे प्रकरण 'हिट अँड रन' गुन्ह्याखाली मोडते किंवा कसे ते तपासण्यात यावे. अलिकडेच पोलीस विभागाकडून वाहनांवर 'पोलीस', 'कस्टम्स', 'महसूल', 'मंत्रालय' इत्यादी नावे असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पारित झालेले आहेत. या अपघातातील वाहनांवर असे 'गैर' प्रकारे नाव आहे किंवा नाही याची चौकशी करावी. वाहनचालक 'मायनर' आहे का ? त्याच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसेंस होते का ? वाहन स्वतःचे होते किंवा अन्य कोणाच्या नावे होते, वाहनामध्ये इतर व्यक्ती होत्या का ? याबाबतही तपशीलवार चौकशी होणे अपेक्षित आहे. उरण येथे पूर्वी घडलेला अपघात, पुण्यातील पोशें कार प्रकरण, मुंबईतील 'हिंट अँड रन' आणि इतर प्रकरणे अलिकडेच घडली आहेत. 
उरणमधील वाहनचालकांना शिस्त लागावी, बेकायदेशीर चालकांना शासन होईल आणि निरापराध नागरिक सुरक्षित राहतील याबाबत आपण कठोर कारवाई करावी अशी मागणी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार,महिला आघाडी प्रमुख सीमा घरत,उपाध्यक्ष काशिनाथ मायकवाड, कार्याध्यक्ष कॉ. भूषण पाटील यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ,न्हावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |