ठाणे, दि.,6 :- “लोकराज्य” या शासनाच्या मुखपत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन नवी मुंबईतील यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई या सामाजिक संस्थेने याविषयी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय रत्नाबाई किसन सावंत, कार्याध्यक्ष सचिन आचरे, अमित शेटे, चंद्रकांत चाळके, कविता कचरे, सुभाष बावडेकर, उपाध्यक्ष प्रकाश बोत्रे, खजिनदार प्रमोद सांळुखे, सचिव संजय आंबुळकर आणि कार्यकारिणी सदस्य जया अलीमचंदानी, चारुशीला शेंडे, विद्याराणी सकटे यांनी या सामाजिक संस्थेतील कार्यरत 100 सभासदांना स्वेच्छेने “लोकराज्य” मासिकाचे सभासद केले आहे. अशा प्रकारचे “लोकराज्य” मासिकाचे सदस्यत्व स्वीकारणारी ही सामाजिक संस्था आर्थिक वर्ष 2024-25 मधील महाराष्ट्र राज्यातील पहिलीच लोकराज्य-सामाजिक संस्था बनली आहे.
या संस्थेकडून सामाजिक, सहकार, आर्थिक, शिक्षण, कृषी, साहित्य कला, क्रीडा, पत्रकार या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. त्यांचे हे कार्य सलग सात वर्षांपासून सुरू आहे. संस्थेने नवी मुंबई परिसरात यशवंतराव चव्हाण वकृत्व स्पर्धेचे सलग दोन वर्षे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे या सामाजिक संस्थेने ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सलग पाच वर्षे केले आहे.
संस्थेतील सभासदांना महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची माहिती व्हावी, शासनाकडून जनतेसाठी कशा प्रकारचे निर्णय राबविले जातात, याची माहिती होण्यासाठी हे मासिक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास संस्थेचे सचिव संजय सावंत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यातील इतर सामाजिक संस्थांनाही वार्षिक वर्गणी अवघे 100 रुपये असलेल्या उपयुक्त अशा या "लोकराज्य" मासिकाचे वार्षिक सभासद होण्यासाठी आवाहन केले आहे.
या सामाजिक संस्थेस येत्या दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी “लोकराज्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे