नवी मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता कामांची तसेच स्वच्छतामित्र व सफाईमित्र यांच्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. यापुढील काळात अधिक चांगले काम होईल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी काही मौल्यवान सूचनाही केल्या.
याप्रसंगी उपस्थित सामाजिक सल्लागार श्री.गिरेंदर नाथ व समन्वयक संदिप चरण यांचाही सन्मान करण्यात आला. सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व श्री.शिरीष आरदवाड आणि विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांचे स्वागत केले. यावेळी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामाची व सोयीसुविधांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. महानगरपालिका स्वच्छताकर्मींचा उल्लेख स्वच्छतामित्र व सफाईमित्र करते, यामुळे स्वच्छताकर्मींच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते याची दखल सदस्य महोदयांनी घेतली.
यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक विविध वाहनांची व यंत्रसामुग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली व सफाईमित्रांशी थेट संवाद साधला.इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिकेचे काम खूप पुढारलेले असून याठिकाणी स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेची व आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असल्याबद्दल डॉ.पी.पी.वावा यांनी समाधान व्यक्त केले.