डोंबिवली प्राईड रन" मधून केले होते निधिसंकलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि रोटरी प्रगती ट्रस्ट या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या 'डोंबिवली प्राइड रन' या मॅरॉथॉन शर्यतीत सोळा ते पंचाऐंशी पर्यंतच्या वयोगटाच्या , एक हजाराहून अधिक स्त्री- पुरुषांबरोबर आर पी एफ च्या पंचवीस तसेच एअर फोर्सच्या पंचवीस जवानांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
दरवर्षी या निधीतून विविध समाजोपयोगी कार्य केले जाते, बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, कुपोषित गर्भवती महिलांना दत्तक घेणे, थालसीमिया च्या रुग्णांना मदत असे अनेक उपक्रम केले जातात. यंदाच्या स्पर्धेच्या गांगाजळीचा विनियोग मात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या शूर जवानांच्या हितासाठी केला गेला.
युद्धात आपले कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या अपंग सैनिकांसाठी पुणे येथे चालविण्यात येणाऱ्या ' पॅराप्लेजिक रिहॅबिलीटेशन सेंटर (पी आर सी) या संस्थेला व्हीलचेअर्स पुरवण्याचा संकल्प गत वर्षीचे रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक काळे आणि उपक्रम प्रमुख श्रीधर गोडसे यांनी जाहीर केला होता.
गतवर्षी झालेल्या DPR च्या निधीतून यंदाचे क्लबचे अध्यक्ष मनोज ओक आणि त्यांच्या सहकारी यांनी या क्लबची उज्वल परंपरा आणि उदात्त हेतू कायम राखत हा सन्माननीय प्रकल्प पूर्णत्वास नेला. यासाठी डी पी आर मधून लाभलेला निधी तसेच प्रकल्प प्रमुख श्रीधर गोडसे, दीपक काळे, मंदार कुलकर्णी इत्यादींच्या अथक प्रयत्नांमुळे आणि व्यवसायाने सी ए असलेल्या शेखर पटवर्धन तसेच सी ए माधव खिस्ती यांच्या प्रयत्नांनी संपादन झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्टच्या आर्थिक मदतीमुळे हा प्रकल्प यशस्वी होण्यास मोठाच हातभार लाभला.
या प्रकल्पासाठी प्रामुख्याने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन, सार्वजनिक बांधकाम मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीकर एक परिवार, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142, DNS बँक आणि सदगुरू दादा रानडे चॅरिटेबल ट्रस्ट यांची खूप मोठी मदत झाली.शनिवार ५ तारखेला या दिवशी पुण्याच्या खडकी परिसरातल्या पीआरसी संस्थेच्या वास्तूत, बाधित जवानांना स्वयंचलित खुर्च्या प्रदान करण्याचा हा हृद्य सोहळा मोठ्या भावुक आणि लष्करी इतमामात संपन्न झाला. याप्रसंगी सूत्रसंचालनाची जबाबदारी पिसीअरच्या मुख्य आरोग्य अधिकारी यांनी कर्नल डॉ.मुखर्जी यांनी सांभाळली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या वतीने आणि रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या शुभहस्ते दोन स्वयंचलित आणि एक मॅन्युअल प्रकारची , अशा तीन व्हीलचेअर्स अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांना प्रदान करण्यात आल्या.
आम्ही सर्वसामान्य जनतेचे घटक आमचे आणि आमच्या मातृभूमीचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या आणि हे कर्तव्य बजावताना स्वतःच्या शरीराची आणि अनेकदा जीवाची आहुती देणाऱ्या जवानांसाठी फार काही करू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे. तरीही जवानांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत राहू असे सांगताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांनी सांगितले.
प्रकल्प प्रमुख आणि रोटरीचे माजी अध्यक्ष श्रीधर गोडसे म्हणाले,आपल्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स मधे जायबंदी झालेल्या आपल्या सैनिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वर्कशॅाप्स ही तेथे आहेत. एक चेअर ही ४ लाख किंमतीची असून त्या जर्मनीहून इंपोर्ट केल्या आहेत. आपण जी डोंबिवली प्राईड रन २०१७ पासून सुरू केली त्यातून हा निधी उभा राहिला. पहिल्या वर्षी आपण पन्नास गर्भवती महिलांना दत्तक घेऊन त्यांचे नऊ महिने संगोपन केले. इंग्लंडची राणी एलिझाबेथ (2nd) हिने या प्रकल्पाचे खास कौतुक केले होते. त्यांनतरच्या वर्षी आपण लहान मुलांच्या हार्ट सर्जरी केल्या त्याचेही संपूर्ण डिस्ट्रिक्टमधे चांगले नाव झाले.
यावेळी रोटरीचे गतवर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी, यंदाचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता , शिरीष सोनगडकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज ओक, मानद सचिव अतुल गोखले, प्रकल्पप्रमुख व माजी अध्यक्ष श्रीधर गोडसे यांच्यासोबत क्लबचे माजी अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष दत्ता कडुलकर, माजी अध्यक्ष दीपक काळे, मंदार कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.