पुणे : १ जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन अभिवादन सोहळ्यासाठी १० लाखांहून अधिक अनुयायी येण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमासाठी शासनाकडून सर्व सज्जता केली जात असून, पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. संपूर्ण जयस्तंभ परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय दोन मोबाईल टेहळणी वाहनांद्वारे वेगवेगळया ठिकाणी चित्रिकरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
पोलीस पथकांसह एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची पथकं सुध्दा तैनात केली आहेत असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं. जयस्तंभाच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी वाहनतळांवर खाजगी गाड्याचं नियोजन केलं असून वाहन तळापासून विजयस्तंभापर्यंत मोफत शहर बस गाड्यांचं नियोजन देखील केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई , सोलापूर, अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गातही बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली.