उरण दि ३० ( विठ्ठल ममताबादे ) : लोकनेते दि.बा. पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावी तसेच स्थानिक भूमीपुत्रांना त्वरित नोकरीत सामावून घ्यावेत अशी मागणी उलवे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुनिल तटकरे, प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
गेली अनेक वर्षे सुरु असणारे स्व. दि. बा.पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचे काम आता पूर्णत्वाकडे असून या ठिकाणी विविध कामासाठी कुशल -अर्धकुशल- अकुशल अशा विविध प्रकारचा रोजगारासाठी स्थानिक रहिवाशी व स्थानिक भूमिपुत्र अशा तरुणांना - तरुणींना संधी मिळणे गरजेचे आहे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस उलवे विभाग तर्फे सिडको प्राधिकरण तसेच विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या अडाणी समूह कंपनी सोबत या साठी पाठपुरवठा, विचारणा केली असता या दोन्ही प्राधिकरण / कंपन्याकडून कुठलीही ठोस माहिती व रोजगारसंबंधी खात्रीशीर आश्वासन मिळू शकलेले नाही. येथील रहिवाशी तथा भूमिपुत्रांना या ठिकाणी विमानतळासाठी आवश्यक गरजेनुसार रोजगार उपलब्ध करून दिल्यास येथील तरुणाई मधील बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. मात्र सध्यातरी त्या अनुषंगाने कुठलीही हालचाल होताना दिसत नसल्याने बेरोजगार तरूणांमध्ये मोठी अस्वस्था आहे. उद्या यामुळे तरुणाईमध्ये रोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.अशी माहिती संतोष काटे यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी या समस्येकडे सामाजिक दृष्टीकोनातून बघत यावर तातडीने कार्यवाही साठी संबंधितांना आदेश,निर्देश देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी केली आहे.स्थानिक तरुण मोठया प्रमाणात बेरोजगार असून बेरोजगारीचा प्रश्न त्वरित निकाली लागल्यास येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या अनेक समस्या मार्गी लागतील अशी आशा बेरोजगारांनी व्यक्त केली आहे.