ठाणे, :- ऑलिम्पिकमधील पहिले पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिन 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयावरील व्याख्यान तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा विषयक चर्चासत्रे, नविन खेळांविपयक चर्चासत्रे, क्रीडा प्रदर्शन, क्रीडा विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दि.१२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात यावे. तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच दि.२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन १९५२ मध्ये हेलसिंकी, फिनलँड येथील ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक (कांस्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी व त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात यावा, असे निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वंयअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये शासकीय तसेच शासनमान्य खाजगी विद्यापीठे, एकविध क्रीडा संस्था/असोसिएशन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी, शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ/अनुदान मिळालेल्या सर्व संस्था, अन्य संस्था/ मंडळे यांनी राज्य क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे. तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा विषयक चर्चासत्रे, नविन खेळांविपयक चर्चासत्रे, क्रीडा प्रदर्शन, क्रीडा विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात यावे. तसेच महाराष्ट्राचे, भारत देशाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी रूही शिंगाडे यांनी केले आहे.