उरण दि १४( विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई,ता.उरण जि.रायगड, या विद्यालयात गोरगरिबांचे कैवारी,या विभागाचे भाग्यविधाते, लोकनेते,दि.बा पाटील साहेब यांची ९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या विद्यालयाचे प्राचार्य आणि रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे एम.के.यांनी दि.बा.पाटील साहेबांच्या पालखीचे पूजन करून, शाळा व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष आणि भारतीय मजदुर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील, शाळेचे चेअरमन अरुण जगे ,व्हाईस चेअरमन डी.आर.ठाकूर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नरेश घरत,जासई ग्रामपंचायतचे सरपंच संतोष घरत इत्यादी मान्यवरांनी विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
दि.बा. पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासई,या संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी कामोठे जुई येथील प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने दि.बा.पाटील साहेबांना मानवंदना देऊन त्यांनी आणलेल्या मशालीचे दीप प्रज्वलन केले गेले, त्यानंतर सर्व मान्यवरांनी, शिक्षक वृंदांनी दि.बा. पाटील साहेबांच्या पालखीचे दर्शन घेऊन ,पालखी शाळेमधून संपूर्ण गावातून फिरविण्यात आली. गावातील सुवासिनींनी दि.बा.पाटील साहेबांच्या पालखीचे दर्शन घेऊन ओवाळणी केली. पालखी सोबत शाळेचे लेझीम पथक तसेच बँड पथक होते. पालखी मिरवणुकीतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण जासई गाव दि बा.पाटील साहेबांच्या नावाने घोषणा देऊन, दि.बां च्या जय-जय काराने दणाणून सोडले होते. पालखी माघारी शाळेच्या मैदानात आल्यानंतर महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासई यांच्यामार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, सल्लागार समिती समितीचे सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक व ग्रामस्थ आणि खास करून दि.बा.पाटील साहेबांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.