Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

तर, नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही : अपर पोलीस आयुक्त संजय जाधव


कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे. प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी येथे केले.


कल्याण पश्चिमेकडील स्वामी नारायण सभागृह येथे प्रेस क्लब, कल्याण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.


पत्रकार हा बातमीमध्ये विविध विश्लेषण वापरण्या बरोबरच त्याबाबतचे संदर्भ आणि अन्य माहिती गोळा करून मांडत असतो. अशा प्रकारची पत्रकारिता करणे सोपे काम नाही. त्याचबरोबर, सध्या सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या स्पर्धेत प्रिंट मिडियाने आपले वेगळेपण जपले आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांनी आपले काम करताना आपल्या तब्येतीची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पत्रकारांनी सुशासन तयार करणे आवश्यक आहे ते करत असताना आपल्यावरचा ताण कमी कसा होईल आणि आपले आरोग्य सुरक्षित कसे राहील याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.


पत्रकारांच्या बातमी मागे असलेल्या कष्टाचा कोणी विचार करत नाही. पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यादेखील वाचक म्हणून आपण जाणल्या पाहिजेत, पत्रकारांच्या समस्यांबाबत कोणी आवाज उठवत नाही. ते देखील आपल्यासाखीच माणसेच आहेत, आपणही त्यांच्याकडे त्या भावनेने बघणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी व्यक्त केले.


मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम प्रेस क्लब राबवत आहे त्यामागची त्यांची भावना महत्वाची असल्याचे मत लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक नवीन नवीन आव्हानांना पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये सध्या वाढ होत आहे. या माध्यमातून चांगल्या बातम्या मिळायला लागल्या तर पत्रकारांची गरज भासणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली गरज निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली लिखाणशैली विकसित करण्यावर भर देणे ही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या बातम्यांमधून आपण वेगळे काय देणार हे महत्वाचे असण्याबरोबरच आपली एक तरी बातमी इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी प्रयत्न करायला हवा.


यावेळी, केडीएमसीच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके यांच्यासह प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विविध वृत्तपत्र , वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना विष्णुकुमार चौधरी, यांनी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर प्रदीप जगताप यांनी आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |