दिवा - कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे असलेले काटई निळजे रेल्वे उड्डाणपूल आज दि.५ ते १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत रेल्वे कॉरिडॉर व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यानच्या काळात नवी मुंबईहून कल्याण डोंबिवली कडे होणारी वाहतूक ही तळोजा एम. आय.डी.सी मार्गे वळवण्यात आलेली आहे. नवी मुंबईहून डोंबिवली साठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून (उदा बस, रिक्षा, ओला, उबर) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या सर्वांना तळोजा मार्गे डोंबिवली गाठणे जिकरीचे ठरणार असल्याने, हे प्रवाशी नवी मुंबई येथून दिवा रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रवास सार्वजनिक वाहनांमधून करण्यास प्राधान्य देवू शकतात. कारण नवी मुंबई वरून दिवा रेल्वे स्टेशन येथे येण्यासाठी चांगली परिवहन सेवा उपलब्ध आहे. दिव्यावरून पुढे हे प्रवासी उपनगरीय लोकल ट्रेनने डोंबिवली वेळेत गाठू शकतात. तसेच जे खाजगी वाहनचालक नवी मुंबई वरून डोंबिवली च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात ते शीळ फाट्यावरून दिवा चौक, आगासान मार्गे थेट मानपाडा डिमार्ट येथे जाण्यासाठी प्रवास करू शकतात.
अशा वेळी दिवा शीळ रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढून दिवा शहरात वाहतूक कोंडी होऊ शकते. सध्या दिवा स्टेशन परिसरात फक्त १ वाहतूक पोलीस आणि २ वॉर्डन उपलब्ध असतात. पण वाहनांची संख्या वाढल्यास दिवा शीळ मार्ग आणि दिवा आगासन मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकेल. त्यामुळे १० फेब्रुवारी पर्यंत दिवा शहरात अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करून दिव्यातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती मनसेकडून करण्यात आली आहे .