ठाणे : दिवा शहरात असलेल्या पान टपऱ्या आणि मद्यपानाची अनेक दुकांन ही पहाटे उशिरा ४ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याचा दावा मनसेने केला आहे. रात्री उशिरापर्यंत या पान टपऱ्या सुरू राहत असल्याने अनेक गर्दुल्ले आणि दारुडे यांचा वावर रात्री या टपऱ्यांच्या च्या आजूबाजूला असतो. दिव्यात रात्री शेवटच्या लोकलने देखील अनेक प्रवासी असतात. या प्रवाशांच्या अंगावर हे गर्दुल्ले धावून जातात.
काही पान टपऱ्यांवर तर गांजा सारखे अंमली पदार्थ देखील विकला जात असल्याचे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे. राज्यात बंदी असणारा गुटखा देखील दिव्यातील पान टपऱ्यांवर सहज मिळताना दिसून येतो. त्यामुळे या अशा पान टपऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पोलिस उपायुक्तांना भेटून केली आहे.