पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदन जारी केलं. मॉरिशस आणि भारत सांस्कृतिक दृष्टयाही जोडले गेले असून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर ,दोन्ही देश परस्परांचे सहकारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारत आणि मॉरिशस यांच्यात गेल्या १० वर्षात संरक्षण संबंधाना नवा आयाम प्राप्त झाल्याचं पंतप्रधान म्हणाले.
मॉरिशस संसदेची नवीन इमारत उभारण्यासाठी भारत सहकार्य करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांदरम्यान ८ सामंजस्य करार झाले. सेंट्रल बँक ऑफ मॉरिशस आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातला करार, पथ सुविधा करार, भारतीय नौदल आणि मॉरिशस पोलीस यांच्यातला करार, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रात भारत आणि मॉरिशस यांच्यादरम्यान झालेल्या करारांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथसाठीच्या महासागर ह्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. महासागर म्हणजे, संपूर्ण परिसराच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी परस्पर सहकार्य आणि सर्वंकष विकासासाठीची वाटचाल. ह्या उपक्रमाअंतर्गत, विकासासाठीचा व्यापार, क्षमता बांधणी यांचा समावेश असेल.
हा उपक्रम, भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या दीर्घकालीन संबंधांचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे. आपला यशस्वी दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत.