ठाणे - जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलीचा सत्कार प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. दि.८ मार्च, २०२५ रोजी बी. जे हायस्कूल ठाणे येथील सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर, महिला कर्मचारी यांचा सत्कार त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर, महिला कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी केली आहे. दररोजच्या कामकाज महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्नशील राहावे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके, सामाजिक कार्यकर्ता उज्वला गलांडे, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सत्कारमूर्ती व त्यांचे कुटुंबीय, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी प्रास्ताविक करताना, जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल सखोल माहिती दिली तसेच ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी आयआयटी बॉम्बे यांच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थेच्या मदतीने, बाळंत विडा, तसेच गरोदर महिला व बालकांना सकस आहार दिले जात असून कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश मिळाले, कामकाजातील यश या विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले.
या प्रसंगी 2 पर्यवेक्षिका, 8 अंगणवाडी सेविका, 8 अंगणवाडी मदतनीस व 8 आशा वर्कर अशा एकूण 26 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000/- (अक्षरी र. रू. दहा हजार मात्र) प्रमाणे धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलीचा सत्कार करण्यात आले असून पुरस्काराची रक्कम रु. 20,000/- (अक्षरी र.रु. वीस हजार मात्र) धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त कामाची दखल घेतली गेली आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. - पर्यवेक्षिका, तालुका शहापूर, शारदा पवार
कार्यक्रमात थियेटर ऑफ रिलेवंस रंगकर्मी यांच्या माध्यमातून नाटक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री भेरे यांनी केले. धनश्री साळुंखे यांनी आभार व्यक्त केले.