Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

महाराष्ट्रातील पहिला, आगळा वेगळा किन्नर महोत्सव कल्याणात साजरा


किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मोटीवेशन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अस्मिता किन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिला आगळा वेगळा किन्नर महोत्सव अतिशय दिमाखदार पध्दतीने आज कल्याणच्या प्र.के.अत्रे मंदिरात साजरा झाला. किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मोटीवेशन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी या कार्यक्रमाचे वेळी दिली.समाजातील प्रत्येक घटकांना समान मानवी हक्क मिळाला पाहिजे,शासकीय योजनांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करु, असेही त्या पुढे म्हणाल्या.


यावेळी व्यासपीठावर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉ.शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब, किन्नर माँ ट्रस्ट फाऊंडर डॉ.सलमा खान, सोशल ॲन्ड जेन्डर राईट ॲडव्होकेट डॉ.सान्‍वी जेठवानी, हमसफर ट्रस्टचे सीईओ विवेक आनंद, किन्नर समुदायाचे इतर मान्यवर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त संजय जाधव, महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, माजी पालिका सदस्या व इतर मान्यवर उपस्थित होते.


किन्नरांप्रती लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याची गरज असून, किन्नर पंथीयांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी, असे आवाहन किन्नर अस्मितेच्या फाऊंडर गुरु निता केणे यांनी यावेळी केले.


अतिशय प्राचीन कालापासून किन्नरांना उपदेवता म्हणून गौरविण्यात आले आहे. परंतु आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे,यासाठी शिक्षणात आणि अधिकारात एकी दाखविली पाहिजे असे मत डॉ.शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब यांनी यावेळी व्यक्त केले. तर नाल्सा जजमेंटमुळे आम्हाला ओळख मिळाली, आम्हालाही समाजात समान वागणूक मिळावी अशी इच्छा आहे, भारतातील इतर नागरीकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन सोशल ॲन्ड जेन्डर राईट ॲडव्होकेट डॉ. सान्वी जेठवानी यांनी आपल्या भाषणात केले. तृतीय पंथीयांसाठी ॲक्टीव्ह ट्रान्सजेन्डर असा बोर्ड असावा, म्हणजे तृतीय पंथीयांसाठी काम करता येईल, यासाठी तृतीय पंथीय समाजाने एकजुटीने रहावे, असे मत किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी तृतीय पंथीय कलाकारांनी श्री गणेश वंदना, लावणी नृत्य, राधा कृष्ण नृत्य, जोगवा आणि किन्नरांच्या हक्काकरीता जनजागृती करण्यासाठी बुरगुंडाचे (ज्ञानप्राप्ती) सादरीकरण असे एकाहुन एक अ‍त्युत्कृष्ठ ,अप्रतिम कार्यक्रमांचे सादरीकरण करुन, उपस्थितांची मने जिंकून घेतली. किन्नर पंथीयातील सर्वच मान्यवरांनी महापालिकेने किन्नर अस्मिता संस्थेच्या मदतीने आयोजिलेल्या या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आणि महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी केले. सन्मान- ओळख- आनंद आणि हा उत्सव आज साजरा झाला. परंतू पुढील वाटचाल हातात हात घालून करायची आहे. आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना महापालिका पुढे आणणार आहे, अशी ग्वाही महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी आभार प्रदर्शनाच्या छोटेखानी भाषणात दिली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपआयुक्त संजय जाधव आणि समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |