दिनांक १२.०३.२०२५ : लोकसभेत आज तेलक्षेत्र सुधारणा विधेयक-२२४ मंजूर करण्यात आलं.या विधेयकामुळे तेलक्षेत्र नियमन आणि विकास कायदा १९४८ च्या ऐवजी नवा कायदा येणार आहे, ज्यानुसार खनिज तेलांच्या व्याख्येत बदल करुन, हायड्रोकार्बन, कोल बेड मिथेन आणि शेल गॅसचा त्यात समावेश केला जाईल. जगभरात विजेची उपलब्धता, शाश्वतता आणि स्वस्त ऊजेचा प्रश्न बिकट झालेला असताना, भारतात मात्र या तिन्ही घटकांवर काम करुन, स्वस्त ऊर्जा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असं पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी यावेळी सांगितलं.
आज भारत चाळीस देशांकडून तेलाची आयात करतो आहे, मात्र, पुरवठयाचा कोठेही तुटवडा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारतात कच्च्या तेलाच्या उत्नादनात घट झाली आहे आणि आयात वाढली आहे, असं काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी यावेळी या चर्चेत बोलताना सांगितलं. सरकार आयात कमी करण्यासाठी, काय करत आहे, अशी विचारणा त्यांनी केली.