Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

नवी मुंबई : महिलांमार्फत विविध कलागुणदर्शनपर कार्यक्रम सादर करीत सुरू झालेला नवी मुंबई महानगरपालिका आयोजित जागतिक महिला दिनाचा विशेष कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात जल्लोषात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री श्री.ना.गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, श्रीम.नयना ससाणे, श्रीम.ललिता बाबर, श्रीम.अभिलाषा म्हात्रे, नगरसचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्रीम.शुभांगी दोडे, विभाग अधिकारी श्रीम.अलका महापूरकर आणि माजी महिला लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच ख-या अर्थाने महिलांना सामर्थ्यवान बनविणे असून त्यादृष्टीने महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि महिला बचत गट तसेच महिला मंडळांनी बनविलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरीवाला भूखंडांवर हॉकर्स प्लाझा बनवून त्याठिकाणी महिलांना विशेष प्राधान्य द्यावे असे मत महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री ना.श्री. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

कर्तृत्ववान पुरूषाला घडविण्यात त्याच्या माता – भगिनींचा तसेच पुढेही त्याला खंबीर साथ देणा-या पत्नीचा महत्वाचा वाटा असून महिलांविषयीच्या आदरभावाने हा महिला दिन जगभरात साजरा केला जातो असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिका यानिमित्त प्रत्येक वर्षी कर्तबगार महिलांचा सन्मान करते तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित करते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळात महिलांच्या कर्तृत्वाला अधिक वाव देण्याच्या संधी मा.पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेनुसार लोकसभा व विधानसभेतील सदस्य संख्येत वाढ करून दिल्या जाणार असून त्यास अनुसरून महानगरपालिकेनेही महिला बालकल्याण विभागासाठीचे आपले बजेट वाढवावे अशी सूचना त्यांनी केली.

याप्रसंगी बोलताना आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मॉलमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच एखादी स्वतंत्र इमारत बांधून त्याठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजापरेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न व्हावेत अशी सूचना केली. महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य ते आमदार या प्रवासातील काही अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका अगदी सुरूवातीपासूनच महिला विकासासाठी काम करीत असल्याचे सांगत त्यांनी यापुढील काळात महिलांकरिता सुलभ रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा असे मत मांडले.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समाजातील महिला व पुरूषांच्या व्यस्त प्रमाणाबद्दल गांभीर्य व्यक्त करीत ही विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकानेच जागरूक होण्याची गरज व्यक्त केली. महिलांना प्रत्येक बाबतीत समान दर्जा उपलब्ध करून देणे हे आपले ध्येय असले पाहीजे असे मत त्यांनी मांडले. नवी मुंबई महानगरपालिका विविध योजनांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून महिला कल्याणासाठी विशेष काम करीत असल्याचे सांगत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सजगता राखत सध्याचे कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन टाटा कॅटरेक्टच्या सहयोगाने कर्करोग तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचा लाभ सर्व महिलांना घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. आगामी काळात महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध कसा होईल याकडेही विशेष लक्ष दिले जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांनी प्रास्ताविकर मनोगतातून नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालविकासासाठी करीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली तसेच स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरिकांचा प्रतिसाद केंद्र सरकारमार्फत नोंदविला जात असून प्रत्येक महिलेने कर्तव्य भावनेने आपला प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित महिला अधिकारी उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, श्रीम.नयना ससाणे, श्रीम.ललिता बाबर, श्रीम.अभिलाषा म्हात्रे, नगरसचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्रीम.शुभांगी दोडे, विभाग अधिकारी श्रीम.अलका महापूरकर यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिला प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.

तसेच श्रीम.करिष्मा शहा यांना महिला उद्योजकता पुरस्कार, शेल्टर असोसिएट्स यांना स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था पुरस्कार, श्रीम.मिनल मंडलिक यांना दिव्यांगांकरिता उत्कृष्ट कार्य करणारी महिला पुरस्कार, श्रीम.सुमन बंडगर यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका व श्रीम.रंजना साळी यांना उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका पुरस्कार, श्रीम.करूणा कोटकर यांना विनावेतन काम करणा-या समाजसेविका पुरस्कार तसेच श्रीम.ललिता जितेकर यांना उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

त्यासोबतच उत्कृष्ट महिला आशा सेविका म्हणून श्रीम.अनिसा शेख (बेलापूर), श्रीम. प्रतिक्षा पांचाळ (नेरूळ), श्रीम.गीता कदम (वाशी), श्रीम.संध्या आतकरी (तुर्भे), श्रीम.सुषमा फुलमाळी (कोपरखैरणे), श्रीम.शुभांगी देवकर (घणसोली), श्रीम.सविता सुंबे (ऐरोली), श्रीम.सुशिला कोकणे (दिघा) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच श्रीम.लता पड्याची (बेलापूर), श्रीम.निता ठाकूर (नेरूळ), श्रीम.संगम्मा रूदवडे (वाशी), श्रीम.वंदना गायकवाड (तुर्भे), श्रीम,नमिता विभे (कोपरखैरणे), श्रीम.बारकुबाई मढवी(घणसोली), श्रीम.जयश्री पाटील (ऐरोली), श्रीम.सिताबाई जाधव(दिघा) या महिला स्वच्छतासखींना उत्कृष्ट महिला स्वच्छताकर्मी म्हणून सन्मानीत करण्यात आले.

महिलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित कलागुणदर्शनपर स्पर्धांना उत्साही प्रतिसाद लाभला होता. त्यामध्ये समुह गायन स्पर्धेत रूचिरा गानसमुह ऐरोली यांनी तसेच समुह नृत्य स्पर्धेत डान्सींग दिवाज् सानपाडा यांनी सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. समुह नाटिका स्पर्धेत नेरूळ येथील पंचशील सामाजिक संस्था समुह आणि महिला भजन मंडळ स्पर्धेत विठ्ठल रूक्मिणी महिला भजन मंडळ कोपरखैरणे यांनी प्रथम क्रमांकाचा बहुमान संपादन केला. मंगळागौर स्पर्धेत वाशीचा राजा महिला समुह प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या प्रत्येक पाचही स्पर्धांतील विजेत्यांस अनुक्रमे 3 व उत्तेजनार्थ पारितोषिके रोख व सन्मानचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आली.

यावेळी सर्वच स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांनी उत्साहात आपले सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अखेरीस लकी ड्रॉ काढून प्रत्येक विभागातील भाग्यवान विजेत्या महिलेला पैठणी प्रदान करण्यात आली. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हाऊसफुल्ल गर्दीत जल्लोषात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |