डोंबिवली ( शंकर जाधव ) : सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या इमारतींच्या गराड्यात आता चिमण्या दिसून येत नाहीत. चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयी जागृती म्हणून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांच्या संख्येत कमतरता दिसून येत आहे. आता सर्वत्र ऐकू येणारी चिवचिव चिमणी गेली कुठे असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना बरोबर चिमणी प्रेमींना पडला आहे. आता पुढील पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
डोंबिवलीतील चिमणी प्रेमी शैलेश भगत हे गेली अनेक वर्ष "चिमणी बचाव" जनजागृती करत आहेत. यासाठी त्यांनी नागरिकांना आपल्या घराच्या बालकनीत कृत्रिम घरटे लावण्याची विनंती केली आहे. पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर त्यांनी नागरिकांना चिमणी घरटे वाटप केले.
याविषयी चिमणी प्रेमी शैलेश भगत सांगतात की, शहरात चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा आवाज अलीकडे फारसा ऐकिवात येत नाही. चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरट्यासाठी छोटीशी जागाही नाही. त्यामुळेच चिमण्याचे घरटे म्हणून अनेकजण माझ्याकडे चौकशी करत असतात. अनेक डोंबिवलीकर चिमणीप्रेमी आहेत.