ठाणे - जिल्हा ठाणे अंतर्गत स्वयं सहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग डॉ. विजय सुर्यवंशी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, रोहन घुगे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी महोत्सव "कोकण सरस, जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शन" दि. 12 ते 16 मार्च 2025 दरम्यान, गावदेवी मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे (प) येथे आयोजित करण्यात आला होता.
खास करून महिलांनी स्वतः बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे 188 स्टॉल लावण्यात आले होते. त्यात 450 हून अधिक महिलांचा सहभाग होता. यापैकी 19 खाद्यपदार्थाचे (Food Stall) स्टॉल व 169 हस्तकला वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. सरस प्रदर्शनास मुंबई, मुंबई उपनगरे व ठाणे तसेच इतर जिल्हयातील जवळपास 15,000 ग्राहकांनी भेट दिली व उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन खरेदी केली.
स्वयं सहाय्यता समुहातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंची 66.31 लक्षची विक्रमी विक्री या प्रदर्शनात झाली, अशी माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, ठाणे छायादेवी शिसोदे यांनी दिली.